January 13, 2013

अलिबाग कुलाबा किल्ला-भाग २

कुलाबा किल्ल्यातील मंदीर परिसरातून आणखी पुढे गेल्यावर आपण तीन बाजूंनी तटबंदीचे अवशेष असलेल्या, किल्ल्याच्या समुद्राकडील भागात पोचतो.
निमुळत्या होत गेलेल्या तटबंदीच्या शेवटी असलेला समुद्राकडे उघडणारा दरवाजा आणि दगडी नक्षीदार कमान लक्ष वेधून घेते. दरवाज्याच्या अडसरासाठी भिंतीत कोरलेला कप्पा पाहून किल्ल्याच्या सुरक्षिततेची कशी काळजी घेतली जात असेल याची कल्पना येते.

या दरवाज्यात उभे राहून, किल्ला ज्या काळ्या कातळावर उभारलेला आहे तो किल्ल्याच्या पायाचा भाग आणि त्यावर आपटणा-या खळाळत्या लाटा पहाता येतात. आपण ओहोटीच्या वेळी किल्ल्यात जात असल्याने भरतीच्या वेळी हा भाग किती पाण्यात बुडत असेल आणि लाटांचे स्वरूप कसे रौद्र असेल त्याची केवळ कल्पना  करून मागे फिरावे.

मागे वळून पाहिल्यावर दुरुन पुन्हा मंदीराच्या शुभ्र कळसाचे दर्शन होतेच. किल्ल्याच्या विविध भागातून अनेक कोनांतून या कळसाचे फोटो काढले.
किल्ल्याच्या शेवटच्या टोकापासून परत येताना उजव्या हाताला असलेल्या तटबंदीच्या कडेकडेने चालत आल्यावर किल्ल्यातील तलाव नजरेस येतो. खरेतर हा तलाव मंदीराच्या समोरच आहे, पण असे विरूद्ध बाजूने पाहिल्यास तलावाच्या काठाचे व तलावात उतरणा-या दगडी पाय-यांचे उत्तम फोटो काढता येतात.पार्श्वभूमीला कळसाचे दर्शन येथेही होतेच.
तलावाच्या काठाने आणखी काही अंतर गेल्यावर किल्ल्यातील रहिवाशांची घरे आहेत. थोडेसे वर चढून किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील बुरुजावर जाता येते. येथून किल्ल्याच्या मुळ भागापासून तुटलेल्या मोठ्या बुरुजाचे व त्यामागे अलिबाग किना-याचे दर्शन होते. या तुटलेल्या भागाला 'सर्जेकोट' असे म्हणतात.
 तेथून जरा डाव्या हाताला गेल्यावर  बुरुजावर,  समुद्राकडे रोखून ठेवलेल्या ब्रिटीशकालीन तोफा दिसतात. या तोफा आकाराने मोठ्या व सुस्थितीत आहेत. या तोफा चार चाकांच्या लोखंडाच्या गाड्यावर ठेवलेल्या आहेत. इतकी वर्षे उन पाऊस व खारा वारा खाऊनही अजूनही त्यावरील अक्षरे नीट वाचता येतात.
 जवळच दोन अगदी छोट्या आकाराच्या तोफाही दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या दिसतात.

प्रवेशद्वारावरील बुरुजावरून खाली किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजूचे नीट निरीक्षण करता येते.
बाहेर आमचा गाडीवाला सज्जच होता.
आणि आम्ही पुन्हा एकदा घोडागाडीतून किना-याकडे रवाना झालो, तोवर अंधार होत आला होता. मात्र रेतीवरील उथळ पाणी अजूनही छान चमकत होते.

December 28, 2012

अलिबाग - कुलाबा किल्ला -भाग १


या सुट्टीमध्ये एका संध्याकाळी, ओहोटीची वेळ साधून, प्रसिद्ध कुलाबा किल्ल्याचा फेरफटका मारायचे ठरवले. किना-यापासून चालत जाणे सहज शक्य असते, पण निघायलाच थोडा उशीर झाल्याने वेळ वाचवण्यासाठी किना-यापासून घोडागाडी ठरवली. त्यामुळे अगोदरच उत्साहात असलेली बच्चे कंपनी आणखी खूश झाली.
पाठीमागे दूर दूर जाणा-या किना-याकडे पहाता पहाता, पाचच मिनिटात घोडागाडी किल्ल्याच्या दरवाजाशी जावून उभी रहिली. तेथूनच मग फोटो काढायला सुरुवात केली ती परत येइपर्यंत ! तेच फोटो येथे शेअर करतोय....फोटो खूपच आहेत, म्हणून दोन भागात देत आहे. पहिल्या भागात प्रवेशद्वार व किल्ल्यातील मंदीरांचा परिसर बघुन दुस-या भागात किल्ल्याची मागील बाजू, तटबंदी, इंग्रजकालीन तोफा, दगडी बांधकाम व सुंदर पाय-या असलेला तलाव आणि किल्ल्यातून दिसणारे अलिबाग तसेच तटावरून समुद्राचे दर्शन घेवूया.

-
समुद्रातून येताना पाहिल्यास किल्ल्याचा मुख्य दरवाजा सरळ समोर दिसत नाही. थोडे उजव्या हाताला वळल्यावर दोन मोठ्या बुरुजांमध्ये असे त्याचे दर्शन होते.
दरवाजातून आंत जाताना कोनाड्यातील देवतांचे दर्शन होते.
किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून तो बघण्यासाठी तिकीट काढले आणि खात्यानेच लावलेल्या फलकावरील किल्ल्याचा थोडक्यात इतिहास व माहिती वाचून पुढे निघालो. उजव्या हाताला पद्मावती देवी व गोलवंती देवी यांची छोटी पण प्राचीन मंदीरे आहेत. किल्ल्यात कोळी लोकांची वस्तीही आहे.

पुढे दोन्ही बाजूला जुन्या अवशेष व वाढलेल्या गवतामधून पायवाट किल्ल्याच्या दुस-या टोकापर्यंत जाते. उजव्या हाताला मंदीरे तर डाव्या हाताला तलाव व तटाला लागून वस्ती आहे.मंदीरांभोवती दगडी भिंती असून आंत दगडी फरसबंदीचे प्रांगण आहे.मंदीरांचे काळ्या दगडातले जुने बांधकाम नक्षीदार असून दीपमाळ व अतिशय सुरेख कलाकुसर केलेले दगडी तुळशीवृंदावन आहे. मंदीराच्या प्रांगणातील दगडी हौद (कि यज्ञकुंड ?) वैशिष्ट्यपूर्ण असून जवळच गणपती व हनुमान मंदीरेही आहेत.किल्ल्यात सर्वत्र पांढ-या चाफ्याची वठलेली झाडे आढळतात.


Loading...
.

Followers